त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षे येथील संतापजनक प्रकार; स्थानिकांकडून निषेध
** विक्रम पासलकर
गोंदे दूमाला : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्य शासनाच्या ग्रामीण आरोग्य विभागामार्फत गरोदर मातेला आणि बाळाला शासनाने मोफत ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच शून्य असल्याची धक्कादायक बाब आज आदिवासी त्र्यंबकेश्वर तालुक्यातून समोर आली आहे. दोन तास आधी कळवून ही ॲम्बुलन्स न आल्याने गरोदर मातेवर रस्त्यातच डिलिव्हरीची वेळ आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षे येथील एका गरोदर मातेला आज सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी सहा वाजेपासून संबंधित कुटुंबीय 102, 108 वर कॉल करून ॲम्बुलन्सची मागणी करत होती. मात्र त्यांना अनेक कारणे सांगून ॲम्बुलन्स देण्यास नकार देण्यात आला. शेवटी त्या गरीब आदिवासी मातेला एका खाजगी वाहनातून त्र्यंबकेश्वर येथे डिलिव्हर साठी नेत असताना पहिणे गावा जवळ खाजगी वाहनामध्ये डिलिव्हरी झाली. सुदैवाने ती प्रक्रिया जरी सुखरूप झाली असली तरी शासकीय ग्रामीण यंत्रणा या निमित्ताने गरोदर माता व त्यांचे संगोपन करण्यासाठी किती उदासीन आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचा प्रत्यय ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला आला आहे.
आ. खोसकर यांच्याकडून अपेक्षा..
कॉल करूनही वेळेवर वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या शासकीय यंत्रणेचा जाहीर निषेध करण्यात येत असून आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवासच का, असा सवाल करण्यात येत आहे. आदिवासिंचे तारणहार आणि रुग्ण मित्र म्हणून परिचित असलेले या भागाचे आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत यंत्रणेला सुचित करून पुन्हा अशी वेळ एखाद्या गरोदर मातेवर येऊन देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments are closed.