मुंबई/एनजीएन नेटवर्क
येत्या ८ सप्टेंबर २०२३ रोजी दुबईमध्ये ख्यातकीर्त पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आशा@90’ लाईव्ह कॉन्सर्ट या खास सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रॉडवे म्युझिकलच्या धर्तीवर या शोचे आयोजन करण्यात आले असून तब्बल तीन तास आशाताई रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
हिंदी चित्रपसृष्टीतील तब्बल आठ दशकांतील आशाताईंच्या सुरेल कारकिर्दीला मानवंदना देण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याची माहिती या कॉन्सर्टचे आयोजक पीएमई एन्टरटेंमेंटचे सलमान अहमद यांनी दिली. या संगीत सोहळ्याच्या दिग्दर्शनाची धुरा खुद्द आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी घेतली असून संगीत संयोजन नितीन शंकर यांचे असणार आहे. या कार्यक्रमासाठी परेश शिरोडकर नृत्य दिग्दर्शन करणार आहेत. हा शो भारतात आणि जगभरात ठिकठिकाणी वर्षभर फिरणार असून आशाताईंची नव्वदी अशा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याचे आनंद भोसले यांनी सांगितले.