सातपूर/एनजीएन नेटवर्क
येथील परप्रांतीय महिला हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी झालेल्या धक्कादायक खुलाशात कुटुंबातील सदस्यानेच महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. सदर महिलेला जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच संपवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सातपूर येथील विधाते मळा या परिसरात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणात सातपूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी चक्रे फिरवत काही तासाच्या आत संशयितांना अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करताच आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. गावाकडील जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने चुलत सासऱ्यानेच चुलत सुनेचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मूळच्या मध्य प्रदेश आणि सध्या सातपुर येथे राहणाऱ्या अशोक्तीबाई शनीदयाल बैगा या परप्रांतीय महिलेची सोमवारी सकाळी हत्या झाली होती. सोमवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक्तीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता.
सुरीने गळा चिरला
गावाकडे भांडण करून नुकतेच बैग कुटुंब सातपूरला आले होते. सोमवारी सकाळी संशयित आरोपी आपल्या चुलत सुनेला जमिनीच्या वादावरून विचारणा करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. नंतर भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात चुलत सासर्याने महिलेच्याच स्वयंपाक घरातील सुरीने चुलत सुनेचा गळा चिरला आणि नंतर तिथून पोबारा केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने हत्येची कबूली दिली