NGN News
Latest Marathi News

नवीन परतफेड योजना, सामोपचार योजनांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

फसवणूक असल्याचा आरोप; शेतकऱ्यांचा संतप्त विरोध; योजना तत्काळ थांबवण्याची मागणी

येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आणलेली २०२५-२६ च्या ‘नवीन परतफेड योजना’ आणि ‘सामोपचार योजना’ या नावाखाली थकीत कर्जदार शेतकऱ्यांची भयंकर फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मूळ कर्जासोबतच कर्ज अनुत्पादक होण्यापूर्वी चे सर्व व्याज आणि दंडव्याज तसेच ठेऊन कर्ज अनुत्पादक झाल्याच्या दिवसा पासून व्याजावर सवलत देत असल्याचे दाखवत असून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जवसुलीच्या विळख्यात अडकवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन योजना तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही आपली भूमिका पटवून देत योजनांना विरोध केला आहे.

शेतकऱ्यांनी आधीच नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव कोसळणे, पाणीटंचाई अशा संकटांतून आर्थिक कोंडीत सापडले असताना, ही योजना संपूर्णत: शेतकऱ्यांनी नाकारली आहे.

भाषा सामोपचाराची, योजना लुटीची….

@ शासन आणि बँक सांगत आहेत की, ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे; परंतु या योजनेंतर्गत कोणतीही व्याजमाफी, दंडमाफी किंवा शाश्वत दिलासा दिला जात नाही, उलट शेती तारण असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन वसुलीचा दबाव वाढवला जात आहे, अशा फसव्या योजना अमान्य असून आम्ही बँकेचे काहीच देणे लागत नाही, 15 ऑगस्ट ला येवल्यातून संपूर्ण कर्ज मुक्ती ची घोषणा दिली जाणार आहेत,

  • भागवतराव सोनवणे,
    संयोजक, शेतकरी कर्ज मुक्ती अभियान

@ ही परतफेड योजना नसून लबाडा घरचे आमंत्रण आहेत.बँकेच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी एकमुखी विरोध करूनही तीच योजना परत माथी मारली जात आहे.

  • भगवान बोराडे, राज्य अध्यक्ष शेतकरी संघटना समन्वय समिती.

@ शेतकऱ्यांची समजूत काढण्याच्या नावाखाली त्यांच्यावर पुन्हा एकदा बँकेचे दडपण आणले जात आहे. ही योजना रद्द झाली पाहिजे.”
भाऊसाहेब सोमासे, थकीत शेतकरी, कर्जमुक्ती अभियान

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

  1. २०२५-२६ ची परतफेड आणि सामोपचार योजना तात्काळ रद्द करावी.
  2. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
  3. नव्याने थकबाकीदार म्हणून कोणावरही दंडात्मक कारवाई करू नये.
  4. थकबाकीदारांच्या गहाण जमिनी मुक्त करून त्यांच्या मालकी हक्कावर कुठलाही प्रशासकीय टांगती तलवार ठेवू नये.

15 ऑगस्ट ला नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जातून शेतकरी संपूर्ण कर्ज मुक्त झाल्याची घोषणा येवल्यातून येवल्यातून करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाभर “NDCc कर्जमुक्त शेतकरी आंदोलन” छेडले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे
हा विषय केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर अन्नदात्याच्या अस्मितेचा आहे. शासनाने लवकरात लवकर या योजनेबाबत पुनर्विचार करावा, अन्यथा राज्यभर संतापाची लाट उसळू शकते कर्जदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..

Comments are closed.