NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अकार्यक्षम नेतृत्वामुळे शेतकरी शासन मदतीपासून वंचित : संजय चव्हाण

0

सटाणा/एनजीएन नेटवर्क

मार्च व एप्रिल महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील बळीराजा उध्वस्त झाला असून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री तालुक्यात पाहणी दौरा करून गेले, मात्र अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा हा निव्वळ फार्स ठरला असून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अकार्यक्षम नेतृत्वामुळे शेतकरी शासनाच्या मदतीपासून अद्याप वंचित असल्याची घणाघाती टीका बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली.

बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १९ व्या ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाअंतर्गत अंतापुर व मुल्हेर येथे गाव भेटीनिमित्त झालेल्या मेळाव्यात माजी आमदार श्री.चव्हाण बोलत होते. तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, रा.वि.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुयोग अहिरे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष वैभव गांगुर्डे, सरपंच रेखाबाई साबळे, उपसरपंच सुनील गवळी, नामपूर बाजार समितीच्या संचालिका चंद्रभागा शिंदे आदी प्रमुख पाहुणे होते. श्री.चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीने तालुक्यातील शेती, सिंचन व इतर प्रश्नांना प्राधान्य दिले. मात्र भाजपने शिवसेनेचे आमदार फोडून असंवैधानिक पध्दतीने सत्ता मिळविली आणि सत्तेचा दुरूपयोग करीत राजकीय आकसापोटी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायतींच्या चौकशा लावून विरोधकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे एका अर्थाने शिंदे-फडणवीस सरकार ग्रामविकासाला खीळ घालण्याचाच प्रयत्न करीत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव होईल या भीतीपोटी राज्य सरकार निवडणुका घेण्यास टाळाटाळ करीत आहे. तालुक्यातील अकार्यक्षम नेतृत्वामुळे बागलाणचा शेतकरी कांदा अनुदान, बागलाणमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाची भरपाई आदि मदतीपासून वंचितच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले.

केशव मांडवडे म्हणाले, कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी चांगले धोरण राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची ताकद फक्त राष्ट्रवादीमध्येच असल्याचे श्री.मांडवडे यांनी स्पष्ट केले. सुनील गवळी, सुयोग अहिरे आदींची भाषणे झाली. मेळाव्यास ज्ञानेश नंदन, निखिल खैरनार, मिलिंद शेवाळे, नितीन भामरे, मुल्हेर सोसायटीचे उपसभापती सुरेश अहिरे, लक्ष्मण शिंदे, सुनील गर्गे, मधुकर चौधरी, भाईदास महाले, सुकराम पवार, रिपाईचे अध्यक्ष चंद्रकांत खरे, मुरलीधर ढोबळे, बापू बागुल, सुरेश बत्तीसे, विनोद शिंदे, दगुताई जाधव, सोमाकाका बागुल, प्रहार संघटनेचे प्रितेश बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.