NGN News
Latest Marathi News

स्त्री–पुरुष समानतेसाठी कुटुंब ही सर्वात महत्वाची शाळा : संजीव सोनवणे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘लिंगभाव संवेदीकरण कार्यशाळा’

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

स्त्री–पुरुष यांच्यात समानता निर्माण व्हावी यासाठी कुटुंब ही सर्वात महत्वाची शाळा आहे. प्रत्येक मातेने लहानपणापासून आपल्या मुलांमध्ये सर्वांप्रती समान वागणुकीची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.

मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीतर्फे आयोजित दोन दिवसीय ‘लिंगभाव संवेदीकरण कार्यशाळा’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील विविध स्तरांवरील अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभाव समानतेविषयी जाणीव-जागृती निर्माण करणे, कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम २०१३ (पॉश कायदा) बद्दल सविस्तर माहिती देणे व कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी सुसंवादी – निकोप वातावरण निर्मिती करणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेत पुणे विद्यापीठाच्या स्त्री आणि लिंगभाव शिक्षणशास्त्र विभागाच्या चार सदस्यीय चमूने विषय व सत्रनिहाय मार्गदर्शन केले.  कार्यशाळेत लिंगभाव समानतेचे महत्त्व, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) कायदा २०१३ (पॉश कायदा) : एक ओळख, लिंगभाव समानता आस्थापनेमध्ये व्यवहारात आणावयाची कशी?, विशाखा कायदा, राजस्थानातील भंवरीदेवी न्यायालयीन प्रकरण याविषयीची माहिती देण्यात आली. तसेच व्याख्यान, चर्चासत्र, प्रश्नोत्तरे, प्रत्यक्ष कृती व विविध खेळातून प्रबोधन करण्यात आले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब डांगे, श्रीमती दिपाली तायडे, हृषीकेश पवार, प्रा. राजकुमार ननावरे यांनी कार्यशाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यशाळेसाठी विद्यापीठातील सर्व विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि शेतमजूर उपस्थित होते.

Comments are closed.