लासलगाव/एनजीएन नेटवर्क
आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून बरे करून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने महिलेशी जबरस्तीने शरीरसंबंध केल्याची घटना निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे उघडकीस आली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडितेने लासलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. काही तासांमध्ये संशयित आरोपी किशोर लोखंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पीडित महिलागेल्या काही वर्षांपासून आजारी होती. आजार बरा होण्यासाठी तिने अनेक ठिकाणी उपचार घेतले. परंतु, काही फरक पडत नसल्याने शेवटी त्या उपचारांसाठी संशयित भोंदूकडे गेल्या होत्या. त्यानंतर संशयित किशोर संजय लोखंडे हा जादूटोणा व उतारे करून आजार बरे करण्याचे आश्वासन देत पीडितेच्या घरी जात होता. दरम्यान संशयित भोंदूने गेल्या २९ मे रोजी जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने सोबत फोटो काढत सांगेल तसे न केल्यास फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले होते. शिवाय कोणाला काही सांगितल्यास नवऱ्याला जादूटोणा करून मारून टाकण्याची धमकी दिल्याचे म्हटले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत.