- छाप्यात २४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड आदींचा समावेश
** वाल्मिक गवांदे
इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
अवैध क्रेडीट कार्ड रक्कम आणि कर्ज रिकव्हरी करणाऱ्या बनावट कॉलसेंटरचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इगतपुरी येथे मिनाताई ठाकरे संकुल येथे सुरु असलेल्या कॉलसेंटर वरील छाप्यात पोलिसांनी २४ लाख रुपयांचा संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. यात क्रेडीट कार्डद्वारे कर्ज देणे, गृह कर्ज व संबधित कर्जाची वसुली करण्याकरीता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र, शेजारी, यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करुन बैकायदेशीरपणे धमकीचे कॉल करुन त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे चौकशीत आढळून आले. कारवाईत २४.३२ लाख रुपये किमतीचा संगणक, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित ठिकाणी सुमारे ५० कर्मचारी काम करत असल्याचे तसेच ते अवैधरित्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे (वय ३२, रा. महात्मा गांधी नगर, महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी) पारस संजय भिसे (वय २६ रा.रमाबाई कॉलनी, प्रियदर्शनी चाळ कमिटी, घाटकोपर, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Comments are closed.