मुंबई/एनजीएन नेटवर्क
जालन्यात उपोषणावेळी घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराचा वापर केला ही दुर्देवी घटना आहे. अशा प्रकारच्या बळाचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची क्षमा मागितली.
फडणवीस म्हणाले, माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलने झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या घटनेचे राजकारण होणे योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असे चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
तर राजकारणातून बाजूला होवू.. अजितदादांचे आव्हान
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा मी आम्हा तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते हरू. पण उगीच शंका, गैरसमज निर्माण करायचे, समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.
लाठीमाराचे आदेश आम्ही देऊ शकतो का?.. शिंदेंचा सवाल
जालन्यात शुक्रवारी मराठा आंदोलनावेळी हिंसाचार झाला. पोलिसांनी लाठीमार केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. परंतु, लाठीमार का झाला हा प्रश्न अद्यापही अन्नुतरीत आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यावर आरोप करत आहेत, गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. आधी कोणावर आरोप करायचे ते ठरवा. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचे काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. तेही राज्यकर्ते होते, अशाप्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का, दिले जातात का, असा प्रतिप्रश्न शिंदेंनी विचारला.