मुंबई/एनजीएन नेटवर्क
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.
पवार म्हणाले, आमची बैठक झाली आणि दोन दिवसांनी भूमिका बदलली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी तर जाहीर बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवण्यास लोक कमी पडत असतील तर बाहेरुन राष्ट्रवादी पाठिंबा देईल. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी हे सांगितलं होतं. नंतर द्यायची वेळ आली नाही. त्यांचं फार कौतुक होतं असं काही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांमध्ये अंतर कसं पडेल याची काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता.
पवार पुढे म्हणाले, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. चर्चा झाली हेदेखील खरे आहे. पण त्यांचे म्हणणे आहे की, मी दोन दिवसांत धोरण बदललं. जर मी धोरण बदलले तर त्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचे काय कारण होते. ती शपथदेखील अशी चोरुन का पहाटे घेतली. जर आमचा पाठिंबा होता तर दोन दिवसांत सरकार कोसळले कसे? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यावा लागला याचा अर्थ सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो त्यांची ही भूमिका समोर आणण्यासाठी यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या