नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक रोडजवळ शिंदे गावानजीक मुंबई पोलिसांनी 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर त्याच ठिकाणी ड्रग्जच्या कच्च्या मालाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. नाशिक रोड पोलिसांच्या शोध पथकाने ही धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये ड्रगचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. अजूनही नाशिकच्या विविध भागांत कोट्यवधी रुपयांचा ड़्रग्जसाठा असल्याचा संशय आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिक गाठले. त्यावेळी इथल्या शिंदे गावात ड्रग्जची फॅक्ट्रीच सापडली. या फॅक्ट्रीत चक्क एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात होती. पोलिसांनी तब्बल 300 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करत 12 जणांना अटक केली. तर दुसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांनी शिंदे गावापासून हाकेच्या अंतरावरील रहिवासी वस्तीत धाड टाकली. तेव्हा तिथे ड्रग्जसाठी लागणाऱ्या विविध रसायनांचा मोठा साठा आढळून आला. पुणे पोलिसांच्या हातून पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ नाशिकमध्ये ड्रग्जची निर्मिती करत होता. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय टोळीही सक्रिया असल्याचा संशय व्यक्त होत आहे.