नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPF) मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ८.१५ टक्के व्याजदरास केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज (सोमवारी) मंजुरी दिली. देशभरातील सहा कोटींहून अधिक पगारदार कर्मचारी-कामगार जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आहेत, त्यांच्या खात्यात ही व्याजाची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबतचे परिपत्रक सोमवारी (दि. २४) काढले. यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के व्याजाला मंजुरी देण्यात आली आहे.
ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने याबाबचा मागील आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याजदराचा प्रस्ताव मार्च महिन्यात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे पाठविला होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हा व्याजदर ८.१० टक्के होता. हा गत चार दशकात पीएफ खातेदारांना दिला गेलेला सर्वात कमी व्याजाचा दर होता. त्यापेक्षा कमी म्हणजे ८ टक्के व्याजदर ईपीएफओने १९७७-७८ मध्ये दिलेला आहे. आता व्याजदरात वाढ केली गेली असली तरी ईपीएफओकडे २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ६६३.९१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी शिल्लक राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुरुवात होणार आहे.