NGN News
Latest Marathi News

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीची मागणी

  • आरोपींशी झालेल्या झटापटीत गुटखा व्यापाऱ्याचा मृत्यू; गुटख्याने भरलेली पीक अप पळवली

** पंडित पाठक / एनजीएन न्यूज नेटवर्क

लोहोणेर : विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून आलेल्या तीन जणांनी गुटखा भरलेली पीक अप वाहन अडवून चालक व त्या सोबत असलेला व्यापारी जब्बार चांदभाई तांबोळी (५५) यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. यात झालेल्या झटापटीत जब्बार याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार ( दि. ११ ) रोजी मयत जब्बार चांदभाई तांबोळी (५५) रा. पिंपळगाव ( वा. ) हा चांदवड येथील इलियास बागवान यांचे पीकअप वाहन ( क्र एम एच १५ एच एच ८८६१ ) घेऊन गुजरात येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर संबंधित वाहनात माल भरून पुन्हा देवळा येथे येत असताना कळवण तालुक्यातील एकलहरे येथून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला . रात्री 12 वाजेच्या सुमारास भऊर फाट्याजवळ पीकअप वाहनास स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून चालक इलियास बागवान व जब्बार तांबोळी यांना बळजबरीने खाली उतरून स्कॉर्पिओ गाडीत बसविले. आम्ही आयजी स्कॉड चे माणसे असून, तूम्ही गुटख्याची वाहतूक करतात जर तुम्हाला केस करायची नसेल तर आम्हाला २५ लाख रुपये द्या अशी खंडणीची मागणी केली . तसेच त्यापैकी एकाने पीक अप वाहन घेऊन पोबारा केला. यात जब्बार तांबोळी यांनी ११ लाख रुपये देण्याचे कबुल केले.

जब्बार यांचा मुलगा साहिल तांबोळी यास पैसे घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान खामखेडा सटाणा रोडवरील प्रथमेश वाइन जवळ जब्बार तांबोळी यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र संशयित आरोपीनी त्यांना दमबाजी करत मारहाण केली. त्यामुळे जब्बार तांबोळी बेशुद्ध होऊन पडले. हे पाहून संशयित त्यांची गाडी सोडून फरार झाले. त्यांचा मुलगा साहिल तसेच पिंपळगावचे उपसरपंच नदिश थोरात ,महेंद्र पाटील व अमोल पाटील हे चौघे पैसे घेऊन प्रथमेश वाइन जवळ गेले असता जब्बार यास जमिनीवर पडलेलले पाहून सटाणा येथे उपचारासाठी घेऊन गेले. तथापि, डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले .त्यानंतर फिर्यादी इलिसाय सुलतान बागवान ( रा चांदवड ) यांच्या फिर्यादी वरून संशयित आरोपी विलास जगताप ,मुहम्मद शफीक मुहंमद रफिक रा. मालेगाव, महेश भामरे रा. तांदूळवाडी, ता. सटाणा या तिघांवर जब्बार याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जब्बार यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी ,दोन मुले असा परिवार आहे .जब्बार यांच्या एका मुलीचे येत्या 7 मे रोजी लग्न होते .त्यांच्या निधनाने देवळा शहरासह पिंपळगाव ( वा. ) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . या घटनेबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे,सुभाष चव्हाण, नितीन बारहाते, राहुल शिरसाठ तपास करीत आहेत .

——

सदर संशयित हे गोरक्षक असल्याची माहिती मिळत असून, गोरक्षणच्या नावाखाली रात्री अपरात्री वाहनाचा पाठलाग करून वाहने अडवून चालकांना दमबाजी करून त्यांच्या कडून खंडणी उकळत असतात . तसेच गोरक्षणाच्या नावाखाली गोरख धंदे करत असल्याची चर्चा आहे .

Comments are closed.