NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ नियुक्त

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. आज मुंबई अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार पंकज भुजबळ,युवक अध्यक्ष सुरज चव्हाण,प्रमोद हिंदुराव,शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे,सुनीता शिंदे,सिद्धार्थ कांबळे, ॲड. रविंद्र पगार, मुकेश गांधी, अर्शद सिद्दीकी, महेंद्र पानसरे, संजय तटकरे,संतोष धुवाळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली ही अतिशय  आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहरातील देखील बारकावे माहिती आहे. गेल्या २५ वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेलं, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. ते मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेच्या कार्यात मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचं योगदान अतिशय महत्वाच आहे. मुंबई शहराला समीर भुजबळ यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाची गरज होती. मुंबईत पक्षाचे जाळ वाढण्यासाठी समीर भुजबळ हे यशस्वीपणे काम करतील. मुंबई शहराकडे आजवर पक्षाकडून दुर्लक्ष झालं आगामी काळात मुंबईचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाशिक प्रमाणे मुंबई शहराचा समीर भुजबळ यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्या काम करण्याची क्षमता असल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. नाशिक प्रमाणे मुंबईला देखील काम करावं असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,मुंबई शहराला सचिन अहिर आणि त्या नंतर नवाब मलिक यांनी अतिशय चांगल काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेच्या कार्यकाळात समीर भुजबळ यांनी पक्षाचे चिन्ह, झेंडा नोंदणी, बैठका, सभा यासह महत्वाची कामे त्यांनी पार पाडली आहे. पक्षाने समीर भुजबळ यांची मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते पक्षवाढीसाठी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडतील त्यांना आपल्याला सर्वांना अधिक बळ द्यावं लागेल असे त्यांनी सांगितले. मुंबई शहरात समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक उभारी देतील असे त्यांनी सांगितले.समीर भुजबळ यांच्या नेतत्वाखाली मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा मानाचं पान तयार केल्याशिवाय राहणार नाही

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करत असताना समीर भुजबळ यांनी अनेक महत्वाची विकासाची केली. नाशिक विमानतळ, बोट क्लब यासह विविध उत्तम विकासकामे त्यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदीर्घ काळ त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं. प्रदीर्घ काळ काम करण्याचा त्यांना अनुभव असून त्यांच्यावर मुंबई अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतातील कार्यकारिणी निर्माण करण्यात येऊन त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाच्या वाढीस अधिक फायदा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना  समीर भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून आपण पक्षात कार्यरत असून अनेक महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाने खासदारकीची संधी दिली. नाशिकच्या सर्व सामान्य जनतेची सेवेची संधी मिळाल्यानंतर नाशिकच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले. मुंबई हे राज्यातील महत्वाचं शहर आहे. या शहरातच माझी जडघडण झाली आहे. त्यामुळे या शहराच्या प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपण ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक बळकट करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.