नाशिक/एनजीएन नेटवर्क
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत ‘ क्षयरोगमुक्त भारत ‘ या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणा-या संस्था आणि व्यक्तींसोबत समन्वय साधुन आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग, (MOHFW) ने टीबी रूग्णांना पोषण आणि सामाजिक योजना अंतर्गत ‘कम्यूनिटी सपोर्ट टू टिबी पेशंट ‘ हा उपक्रम सुरू केला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेतर्फे क्षयरूग्णांना उत्तम निदान, उपचाराच्या सुविधा या सोबतच पोषण आहार योजना दिली जाते. तरीदेखील या व्यतिरिक्त सुध्दा ज्यादाचा पौष्टीक आहार (शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर ई.) व इतर निदान उपचार सुविधा, व्यावसायिक पुनर्वसन याकरीता त्यांना मदत करावी, असे आवाहन मनपा आरोग्य प्रशासनाने केले, त्याला प्रतिसाद देत काल मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष व भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व सौ. अश्वीनी पेशकार यांनी दहा रुग्णांना पोषण शिधा सुपूर्द केला. पुढील सहा महिने हा शिधा देणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर सहकार्यवाह श्री सुहास वैद्य आणि सेवा विभाग प्रमुख श्री आनंदराव पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.आवेश पलोड, भरत झांबरे, उद्योजक मिलिंद कुलकर्णी व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्वच उद्योजकांना या योजनेत सामील होऊन असे रुग्ण दत्तक घेऊन सहा महिने नियमित पौष्टिक पोषण शिधा देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन उद्योग मित्र संस्थेतर्फे प्रदीप पेशकार यांनी केले आहे.