वणी/एनजीएन नेटवर्क
शनिवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बळीराजाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे बळीराजा आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यांच्या वाहनांचा ताफा दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कांदे , टॉमॅटो रस्त्यावर फेकून अडविण्याचा प्रयत्न झाला. शरद पवार गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह वणी येथे हे आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून पवार यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. वणी पोलिसांनी संबंधितांना तातडीने ताब्यात घेतले.
पवार हे वणीजवळील सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी-कळवण चौफुलीवर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावी, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला. काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.