मुंबई/एनजीएन नेटवर्क
सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवल्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यावर नाशिकमध्ये काम असल्याने निघालो होतो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलण्यात आले नाही. टोलनाकावाल्यांची काहीतरी तांत्रिक अडचण होती. तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी गाडी का थांबवली, असे विचारले. त्यावर तांत्रिक कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण, टोलनाक्यावरील कर्मचारी उद्धट बोलत होते. कर्मचाऱ्याने मॅनेजरला फोन केल्यावर तो सुद्धा उद्धट भाषेत बोलत होता, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. १० ते १५ मिनिटानंतर टोल नाक्यावरून गाडी सोडण्यात आली. पण, हॉटेलला पोहचल्यानंतर कळले की टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली आहे.