नाशिक/एनजीएन नेटवर्क
शिंदे- ब्राह्मणवाडे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निमातर्फे पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिले.
शिंदे ब्राह्मणवाडे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी प्रयत्न करा, असे साकडे निमाला घातले. बेळे यांनी तातडीने तेथील उद्योजकांना चर्चेसाठी निमा कार्यालयात पाचारण केले असता या उद्योजकांनी विविध मूलभूत समस्यांचा पाढा वाचला. शिंदे औद्योगिक वसाहतीत प्लॉट खरेदी करून ग्रामपंचायत मिळकत रजिस्टरला आमची नावे नोंदविण्यात आली आहेत. पैकी 150 हुन अधिक उद्योग सुरू केले आहे,तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आमच्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट आहे.त्याचे त्वरेने डांबरीकरण होणे गरजेचे आहे.कामगारांच्या हिताच्या दृष्टीने तेथील पथदीप तातडीने बसवून मिळावेत. घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था व्हावी.पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रत्येक उद्योजकाला त्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे. ड्रेनेजची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते.वर्गणी आणि खंडणीच्या नावाने अनेक लोक त्रास देतात. त्यांचा बंदोबस्त व्हावा. निमाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र प्लॉट अथवा जागा उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्यांचा उद्योजकांनी यावेळी मांडल्यात.
या सर्व प्रश्नांवर मुद्देसूद्द चर्चा झाली. या वेळी बेळे यांनी वीज मंडळातर्फे सबस्टेशन मंजूर झाले असले तरी त्याबाबत पुढे काही हालचाली नाहीत त्याबाबतही निदर्शनास आणून देताच बेळे यांनी तातडीने अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता या सबस्टेशनसाठी जागा घेतली टेंडर प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनएमआरडीएशी निगडित असलेल्या प्रश्नांबाबत लवकरच नूतन आयुक्त सतीश खडके यांच्याशी बैठक लावून प्रश्नांची उकल केली जाईल असे बेळे म्हणाले. जि.प.शी निगडित असलेल्या प्रश्नाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चा घडवून आणू.वर्गणी अथवा खंडणी कोणी मागत असेल तर तातडीने गुन्हे नोंदवा अथवा निमा कार्यालयाशी संपर्क साधा,असेही बेळे म्हणाले. लेबरसेसच्या नावाखाली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. ज्यांनी पीएफ आणि ईएसआयसाठी नोंदणी केली आहे आणि ज्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे त्यांना लेबरसेस भरण्याची आवश्यकता नाही असे बेळे यांनी निदर्शनास आणले.
शिंदे औद्योगिक वसाहतीत दीडशेहून अधिक उद्योजक असून त्यापैकी अनेक जणांनी आतापर्यंत निमाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.यावेळी निमा सब कमिटी वर शिंदे वसाहतीतील सचिन तेजाळे आणि किरण मते यांना घेण्याचा प्रस्ताव पारित करण्यात येईल. बैठकीस उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कमल किशोर करवा,राजेंद्र वडनेरे,मिलिंद राजपूत,कैलास पाटील,मनीष रावल,राजेंद्र काबरा, विशाल भाटिया, प्रतीक कांकरिया, नितीन पाटील,किरण वाजे,किरण मते, के.ए.जाधव,सचिन तेजळे, विलास सोनवणे,अता शेख आदी सह मोठया संख्येने उद्योजक उपस्थित होते.