NGN News
Latest Marathi News

‘इस्पॅलिअर’ मध्ये दिमाखदार सोहळ्यात ‘एली’ हत्तीणीने विद्यार्थ्यांना सांगितली कथा

  • प्राण्यांबद्दलची संवेदनशील कथा सांगणारी आशियातील पहिली ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण ‘एली’
  • पेटा इंडियातर्फे नाशिकमध्ये पहिल्यांदाच रोबोटिक हत्तीणीचे सादरीकरण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

डोळे मिचकावणे, कान हलवणे एवढेच नव्हे तर अगदी हुबेहूब जिवंत भासणाऱ्या ‘एली’ या ॲनिमॅट्रॉनिक हत्तीणीने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या लहानपणी आईपासून झालेली ताटातूट, सर्कशीत कैद असताना झालेला छळ आणि अखेर सुटका होऊन अभयारण्यात मिळालेल्या आनंदी जीवनाबद्दलच्या संवेदनशील कहाणीने प्राण्यांबद्दलच्या दयाळूपणा आणि त्यांच्या भावनांचा आदर करण्याबाबत प्रबोधनात्मक जागृती केली.

निमित्त होते, पेटा इंडिया, इस्पॅलिअर द हेरिटेज स्कूल आणि उपाध्याय फाउंडेशन यांच्यावतीने आशियातील पहिल्या रोबोटिक एली हत्तीणीचे नाशिकमध्ये दिमाखदार कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, पेटा इंडियाच्या शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग, मीनल शाह, अनुष्का यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ एली’ सादर करण्यात आला.

पेटा इंडिया या संस्थेने मे २०२३ मध्ये प्राण्यांबद्दल संवेदनशीलता व सजगता निर्माण करणारा आशियातील पहिलीच ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण तयार केला असून ही हत्तीणीने आपली कहाणी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगतो. अभिनेत्री दिया मिर्झा यांचा आवाज वापरला असून तो विद्यार्थ्यांना कथा सांगतो. यावेळी एलीने डोळे मिचकावणे, कान हलवणे अशा हालचाली करून शेकडो विद्यार्थ्यांना भुरळ घातली. निसर्ग, प्राणी आणि विद्यार्थी यांच्याकडून आपण नेहमी नवीन गोष्टी शिकत असतो. प्राण्यांबद्दल नव्या पिढीमध्ये संवेदनशीलता दयाळूपणा आणि करुणा निर्माण करण्याच्या दृष्टीने एली हत्तीणीची ही गोष्ट अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल असे मत यावेळी पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले.

सचिन जोशी यावेळी म्हणाले की, “एलीची भेट आमच्या विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ज्ञानवर्धक अनुभव होता. तिच्या जिवंत भासणाऱ्या उपस्थितीने आणि ती घेऊन आलेल्या दयाळूपणाच्या संदेशाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. एलीमुळे विद्यार्थ्यांना समजले की, हत्ती जंगलातले प्राणी आहेत, कैदेत राहणारे नाहीत. या उपक्रमामुळे सर्व सजीवांबद्दल दयाळूपणा आणि आदर यावर अर्थपूर्ण चर्चा सुरू झाल्या.” प्राजक्ता जोशी म्हणाल्या की, “पेटा इंडियाची एली प्रभावीपणे सांगते की, हत्ती हा संवेदनशील, भावनिक प्राणी आहेत आणि त्यांना आदर मिळायला हवा. आमच्या शाळेत तिने घालवलेल्या वेळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि प्राणी कल्याणाबद्दल अर्थपूर्ण विचार सुरू झाले. उपाध्याय फाउंडेशनच्या सहसंस्थापक बृंदा उपाध्याय म्हणाल्या की, या उपक्रमाचा उद्देश हत्ती हे संवेदनशील, दयाळू प्राणी आहेत याची जाणीव करून देणे आणि मुलांच्या मनात करुणा जागवणे हा आहे.

पेटा इंडियाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “एली मुलांना दाखवते की, जसा आपल्याला होतो तसाच प्राण्यांनाही वेदना, भीती, आनंद आणि प्रेम यांचा अनुभव होतो आणि त्यांनाही आपल्याप्रमाणे शांततेत जीवन जगण्याचा अधिकार आहे. इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

हत्ती सांगतो स्वतःची संवेदनशील कथा

स्वतःची संवेदनशील कहाणी सांगणारा अशी आहे ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण. ‘एली’सिलिकॉन व फायबर तसेच पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करत आशियामधील पहिली ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण ‘एली’ तयार करण्यात आली आहे. तिचे वजन सुमारे ३७५ किलो आहे. तर उंची ६.५ फूट, रुंदी ४.५ फूट आणि लांबी ८ फूट आहे. रोबोटिकच्या माध्यमातून डोळे, कान आणि सोंड यांची हालचाल करणारी ही हत्तीण स्वतःची संवेदनशील कथाही सांगतो. मनोरंजनासाठी कैदेत ठेवलेली हत्तीण अनेकदा त्याच्या कुटुंबापासून आणि नैसर्गिक अधिवासापासून वेगळा केला जातो. त्यांना कठोर प्रशिक्षण दिले जाते आणि तीक्ष्ण लोखंडी टोक असलेल्या जड दांड्यांनी नियंत्रित केले जाते. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आणि वेदना निर्माण होते. दीर्घकाळ कैदेत राहिल्यामुळे अनेक हत्ती असामान्य वर्तन दाखवतात, त्यांना पुरेसे अन्न, पाणी व पशुवैद्यकीय सेवा मिळत नाही.

नाशिकमध्ये १६ शाळांना देणार भेटी
पेटा इंडिया व इस्पॅलिअर स्कूल यांच्यावतीने नाशिकमधील १६ शाळांमध्ये ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण ‘एली’ जाणार असून विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी संवेदनशील, दयाळूपणा व आदरभाव जपण्याचा संदेश व जागृती निर्माण करेल..

Comments are closed.