नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
69 व्या वार्षिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवारी संध्याकाळी झाली. सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरणार? यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संवाद लेखक आणि एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
RRR या चित्रपटाच्या तेलगू भाषेच्या व्हर्जनला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. तर रॉकेट्री या सिनेमाला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय. त्याचबरोबर अल्लू अर्जुन याला पुष्पा सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
विकी कौशलचा सरदार उधम सिंह चित्रपट सर्वोत्तम हिंदी सिनेमा ठरला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिमी चित्रपटासाठी क्रिती सेननला देखील देण्यात आला आहे. तर मराठी सिनेमाचा देखील डंका वाजल्याचं पहायला मिळतंय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार गोदावरी सिनेमासाठी निखिल महाजन यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर एस.एस राजमौली यांच्या RRR चित्रपटाला बेस्ट स्टंट, बेस्ट म्युझिक डायरेक्शन, बेस्ट नृत्यदिग्दर्शक, बेस्ट स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर पुरस्कार असे पुरस्कार जाहीर झाले आहेत.