चांदवड/एनजीएन नेटवर्क
ज्या ज्या वेळी मी रेणुका मातेचे दर्शन घेते त्यानंतर अधिक ऊर्जेने स्त्री शक्तीचा प्रत्यय येत असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी चांदवड येथे जाऊन रेणुकामाता आणि चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिरांची यथायोग्य पूजा आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी लवकरच शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विविध पुरातन मंदिरांची दुरुस्ती, डागडुजी, भक्तनिवास यासारख्या सोयीसुविधांवर काम करण्याची आवश्यकता आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी मातेच्या चरणी यथासांग पूजा करून डॉ. गोऱ्हे यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.
त्या म्हणाल्या, स्वतंत्र भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींना देवाबद्दल श्रद्धा वाटली तर कोणाला काही त्रास होण्याचे कारण नाही. त्याकडे दुर्लक्ष करत मी देवस्थानचा विकास करण्यावर भर देते. असे डॉ. गोऱ्हे यांनी मत व्यक्त केले. हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार, देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची व्यवस्थित सोय व्हावी, मंदिरांचा विकास व्हावा याकरिता सतत प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्या नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. यामधून लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असून लोकांना अधिकाधिक सुविधा तात्काळ देण्याचे काम केले जात आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची लोकांना गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.