- बचतगटातील महिलांनी केलेले कार्य समाजाला बळकटी देणारे : डॉ. अश्विनीताई बोरस्ते
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ महिला सेवाभावी संस्था, नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी संस्था, गोविंद नगर, नाशिक तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५–२६ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अश्विनीताई अशोक बोरस्ते, तसेच संचालिका अनिताताई शिरोडे व ऋतुजा दळवी या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.
“राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचा आत्मविश्वास – बचतगटातील महिलांचा सहभाग” या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत बचतगटातील महिलांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
छायाताई भारत घुमरे (नवरंग महिला बचत गट) प्रथम क्रमांक,
हर्षा विकास सोमवंशी (शुभारंभ महिला बचत गट) द्वितीय क्रमांक
उज्ज्वलाताई हनुमंत महाले (गणराज महिला बचत गट) व गटसंघटिका तृतीय क्रमांक
विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. अश्विनीताई अशोक बोरस्ते म्हणाल्या, “राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांनी दिलेला धर्म, आत्मविश्वास व युवकशक्तीचा विचार आत्मसात करून बचतगटातील महिलांनी केलेले कार्य समाजाला बळकटी देणारे ठरणार आहे. आजच्या मोबाईलप्रधान युगात महिलांनी स्वहस्ताक्षरात निबंध लिहिणे म्हणजे हाताला वळण लावणे, बालपणातील शालेय निबंध स्पर्धेच्या आठवणी जागवणे आणि स्वतःचे स्वतंत्र विचार मांडण्याची संधी मिळणे होय.”
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या संचालिका अनिताताई शिरोडे यांनी प्रेरणादायी गीत सादर करून शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आधुनिक काळात लुप्त होत चाललेल्या लेखनकलेला या उपक्रमातून चालना मिळाली. महिलांच्या सुप्त कलागुणांना, अनुभवांना आणि विचारांना व्यासपीठ मिळाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मुकणे यांनी केले, तर समन्वयक शितल बागुल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला, बचतगट प्रतिनिधी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
Comments are closed.