नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक रोडनाजिक शिंदे-पळसे परिसरात मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरु होती.
अमली पदार्थांचा हा कारखाना नाशिक पोलिसांच्या हद्दीत येत असूनही नाशिक पोलिस त्याबाबत अनभिज्ञ असण्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर कारवाईनंतर नाशिक पोलिसांची एकच धांदल उडाल्याचं पाहायला मिळतयं. या प्रकरणात कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची नाशिकमध्ये तब्बल तीन दिवस कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांच्या या कारवाईला अखेरीस यश आले आहे. सदर छापेमारीत दीडशे किलोहून अधिक किलो एमडी ड्रग्ज मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे.आतापर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवायांपैकी ही एक महत्वाची कारवाई म्हणावी लागेल. एकंदरीत या प्रकरणानंतर राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे.