उच्च न्यायालयाकडून एनएमआरडीएला दणका; शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एनएमआरडीए कडून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत एक मोठी बातमी आहे. उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या या कारवाईबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष होता. कारवाईला स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी एनएमआरडीएच्या वतीने ही मोहीम काही दिवसांपासून हाती घेण्यात आली होती. त्यांतर्गत शेतकऱ्यांकडून जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्या तरी त्यांना त्याचा मोबदला देण्याबाबत चुप्पी साधली गेली. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी योग्य मोबदल्यासह न्याय्य जमीन अधिग्रहण प्रक्रिया लागू करण्याची प्रशासनाकडे मागणी केली. शिवाय, जमिनी अधिग्रहित करताना एनएमआरडीए हुकुमशाही वृत्तीचा अवलंब करीत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला होता. याविरोधात हवालदिल शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. काही वकिलांनी एकत्र येवून त्रस्त शेतकऱ्यांचे प्रबोधनही केले. एनएमआरडीएने कॅवेट दाखल केलेले असल्याने त्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. त्यानंतर कारवाईला स्थगिती दिली. यामुळे निर्माण झालेला तिढा सोडवताना एनएमआरडीएला संबंधित २३ शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांना जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात अपेक्षित मोबदला देणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
Comments are closed.