NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मेंदू खाणारा घातक अमीबा भारतात दाखल; उबदार गोड्या पाण्यात..

0

तिरुअनंतपुरम/एनजीएन नेटवर्क

 डिसेंबर २०२२ मध्ये दक्षिण कोरियामध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीचा ‘ब्रेन इटिंग अमीबा’मुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ या वर्षी मार्च महिन्यात फ्लोरिडामध्येही असंच प्रकरण समोर आले होते. त्यानंतर या जीवघेण्या संसर्गबद्दल सर्वांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या अमीबाचा संसर्ग आता भारतापर्यंत येऊन पोहोचला आहे. केरळच्या अलप्पुळा जिल्ह्यातल्या 15 वर्षांच्या एका मुलाचा या अमीबामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी साधारण एक आठवडाभर या मुलाला प्रचंड ताप होता.

‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा त्याच्या घराजवळच्या ओढ्यात आंघोळ करत असे. त्यामुळे हा ओढाच अमीबाचा संभाव्य स्रोत मानला जात आहे. हा अमीबा कोणत्याही नैसर्गिक वातावरणात, विशेषतः उबदार पाण्याच्या अधिवासात वाढतो. तलाव आणि नद्यांच्या गाळात आढळणाऱ्या जिवाणूंवर ते आपली गुजराण करतात. अमीबा खारट पाण्यात टिकाव धरू शकत नाही. म्हणून समुद्राच्या पाण्यात तो आढळत नाही.

नेग्लेरिया फॉवलेरी हा ‘मेंदू खाणारा अमीबा’ म्हणून ओळखला जाणारा एकपेशीय जीव आहे. तलाव, गरम पाण्याचे झरे आणि अस्वच्छ जलतरण तलावांसारख्या उबदार गोड्या पाण्यात तो आढळतो. हा जीव इतका लहान आहे, की केवळ सूक्ष्मदर्शकानेच तो पाहिलं जाऊ शकतो. नेग्लेरिया फॉवलेरी ही नेग्लेरियाची एकमेव प्रजात आहे, जिचा संसर्ग मानवाला होऊ शकतो. पुरेसं क्लोरीन किंवा व्यवस्थित देखभाल नसलेल्या जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड, सर्फ पार्क अशा ठिकाणीही काही वेळा हा अमीबा आढळला आहे. अमीबा त्याच्या ट्रॉफोझोइट अवस्थेत अधिक धोकादायक बनतो. कारण, तो त्याच्या आसपासच्या वातावरणाशी उत्तम पद्धतीनं जुळवून घेतो. 46 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात त्याची चांगली वाढ होते. रेफ्रिजरेशन केल्यास ट्रोफोझोइट्स वेगानं मारले जातात; मात्र सिस्ट अत्यंत थंडीतही टिकून राहू शकतात.

मानवी शरीरात कसा प्रवेश होतो?

अमीबा माणसाच्या नाकातून शरीरात प्रवेश करतो. नंतर ऑलफॅक्टरी नर्व्हद्वारे मेंदूमध्ये जातो आणि मेंदूच्या ऊतींचा नाश करतो. त्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंजोएन्सेफलायटिस (पीएएम) म्हणून ओळखला जाणारा गंभीर आणि घातक मेंदू संसर्ग होतो.

संसर्ग कोणाला होऊ शकतो?

मानवी शरीर ही नेग्लेरिया फॉवलेरीसाठी सुरक्षित जागा मानली जाते; मात्र त्याचा मानवी शरीरात प्रवेश आणि संसर्ग होणं फारच दुर्मीळ आहे. अमीबा मेंदूपर्यंत गेल्यानंतर होणारा पीएएम नावाचा गंभीर संसर्ग कोणावरही परिणाम करू शकतो; पण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेली व्यक्ती, नाक आणि सायनसच्या समस्या असलेल्या व्यक्ती किंवा सतत उबदार गोड्या पाण्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.