नाशिक/एनजीएन नेटवर्क
गुरुगोबिंद सिंग फाउंडेशन संचलित गुरुगोबिंद सिंग तंत्रनिकेतन नाशिक, यांच्या सन्मानात आणखी एक भर पडली आहे. या महाविद्यालयातील प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. स्वप्नीलकुमार पाटील यांची ‘अमेरिकन जर्नल ऑफ फिजिक्स अँड एप्लीकेशन'(AJPA) न्यूयॉर्क, यूएसए या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित जर्नलसाठी समीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
सदरील जर्नल हे (AJPA) वैज्ञानिक संशोधन आणि पुनरावलोकन लेखांच्या प्रकाशनासाठी एक दर्जेदार व उत्तम मंच प्रदान करते. तसेच, सदरील जर्नल भौतिकशास्त्र आणि त्याच्या अनुप्रयोगांच्या विस्तृत क्षेत्रांना समर्पित मूळ शोधनिबंध प्रकाशित करते. या जर्नलमध्ये समाविष्ट केलेले विषय आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंतर्निहित भौतिकशास्त्राच्या आकलनावर भर देतात.
सदरील जर्नल मध्ये देशातील आणि जगातील विश्वविख्यात विद्यापीठे आणि विविध नामांकित संशोधन केंद्रांच्या प्राध्यापकांचा व संशोधकांचा सुद्धा यात समावेश होतो. डॉ. पाटील यांच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या यशाचे, मानाचे कौतुक गुरुगोबिंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाब्रा व इतर मान्यवर सदस्य तसेच प्राचार्य श्रीहरी उपासनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
सदरील निवड ही गुरु गोबिंद सिंग तंत्रनिकेतन आणि डॉ. पाटील यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होय. सदरील निवडीमुळे श्री डॉ.पाटील यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहेत. डॉ. पाटील यांनी आपल्या या यशाचे श्रेय गुरुगोबिंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलवीर सिंग छाब्रा व इतर मान्यवर सदस्यांनी वेळोवेळी दिलेली प्रेरणा व पाठिंबा आणि गुरुगोबिंद सिंग तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्रीहरी उपासनी यांनी या प्रक्रियेसाठी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिली. तसेच, विविध विभाग प्रमुख आणि प्राध्यापकवृंद यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.