अनुक्रमे उपाध्यक्षपदी आणि चिटणीसपदी नियुक्ती; डॉ. पवार यांचे राजकीय पुनर्वसन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीची अखेर मंगळवारी घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांची घोषणा केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपाध्यक्षपदी तर नाशिक शहर महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष रोहिणी नायडू यांची चिटणीसपदी वर्णी लागली आहे.
माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा असलेल्या डॉ. भारती पवार यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सुरु झाला. तथापि २०१९ मध्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या. पहिल्यांदा खासदारकी प्राप्त केलेल्या डॉ. पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. एक उच्चशिक्षित, आदिवासी चेहरा म्हणून भाजपने डॉ. पवार यांना नेहमीच मानाचे पान दिले. आता प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपद देवून त्यांचे एकप्रकारे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडे नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
रोहिणी नायडू ह्या निष्ठावंत चेहरा म्हणून ज्ञात आहेत. नाशिक शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रश्नांवर जनआंदोलने छेडली गेल्याने त्या राजकीयदृष्ट्या प्रकाशात राहिल्या.
Comments are closed.