पुणे/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात केवळ निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी, त्याचबरोबर अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यचे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना, भूमिका स्पष्ट करून लोकांमधला संभ्रम दूर करावा असा सल्ला दिला आहे. चव्हाण म्हणाले, मला वाटतं की शरद पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे पवारांसारख्या अनुभवी नेत्यांनी लोकांमधला संभ्रम दूर करावा. शरद पवारांनी त्यांची भूमिका, जी त्यांनी आधीच घेतली आहे, ती स्पष्ट करून लोकांमधील संभ्रम दूर केला तर अधिक चांगले होईल.