मुंबई/एनजीएन नेटवर्क
महिला प्रश्नांसंदर्भात भेटण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना वेळ मागत होते. मी सातत्याने मेसेज करायचे, पण कधी उत्तर येत होते तर कधी नाही. आठ-दहा जणांचे प्रश्न असले की एकालाच भेट मिळायची. या सर्व कार्यपद्धतीला मी थकले होते असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. अशा नेत्याबरोबर काम करणे शक्य नाही. या प्रकियेत मी स्वतःची समजूत काढत होते. शिवसेनेत हे सगळे घडले नसते तर मी मृत्यूची वाट बघत होते असे वक्तव्यही गोऱ्हे यांनी केले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये केले.
ज्यावेळी आपल्याला कुठेही जायचे नाही किंवा दुसरीकडे जाण्याची मानसिक शक्ती नाही, त्यावेळीच तुम्ही अत्यंत असमाधानी आहात, तेव्हा वाईट वाटते असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तुम्ही उपसभापती करता, पण नेता करावसे वाटत नाही. बर मला नेता नाही केले, पण दुसरी एकही नेता करता येण्यासारखी महिला नाही, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला केला. दरम्यान, माझ्याकडे मेरिट होते, म्हणून मला डावलले गेले. जास्त हुशार माणस नको असे त्यांना वाटत असेल असेही गोऱ्हे म्हणाल्या. पक्षाने मला खूप काही दिले, प्रवक्ता केले, उपसभापती केले. पण महत्त्वाच्या निर्णयावेळी मत विचारात घेतले जात नव्हते असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. निर्णय प्रक्रियेत जर आम्हाला बरोबरीचे स्थान नसेल तर त्याला अर्थ काय? असेही गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर कोरोनाचे संकट आले, त्यानंतर साहेबांची चर्चेची दारे पूर्ण बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यामध्ये आपण दुखावल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळं आपण आपल्या ओझ्यातून साहेबांना मुक्त करण्याचा विचार अनेकवेळा मनात आल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.