NGN News
Latest Marathi News

डोंगराळे ग्रामस्थांचे आमरण उपोषण; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

  • बालिका हत्या प्रकरण; विलंब न करणारे कायदे सुधारित स्वरुपात आणण्याची मागणी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला ३० दिवसांच्या आत शिक्षेची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कायदा करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेची दोन आठवड्यांपूर्वी बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गावातील एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला तत्काळ फाशी द्या अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलनासह कॅण्डल मोर्चे आयोजित करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याची घोषणा केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची शनिवारी घोषणा करण्यात आली. यापूर्वी राज्यात घडलेल्या प्रकरणांत कनिष्ठ न्यायालयांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तथापि, शिक्षेच्या विरोधात अपिलात गेल्याने खटले निकाली निघण्यास विलंब होतो. असा विलंब न करणारे कायदे सुधारित स्वरुपात आणून आरोपीला ३० दिवसांत शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, अशी डोंगराळे ग्रामस्थांची मागणी आहे.

शनिवारी बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात आला असून त्यामध्ये दिनेश ठाकरे, राकेश दुसाने, अजय पाटील, मंगेश खैरनार, गजानन लांडगे, चंद्रशेखर हिरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Comments are closed.