जॉर्जिया/एनजीएन नेटवर्क
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शरण आले आहेत. गुरुवारी सायंकाळी ट्रम्प अमेरिकेतील जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये पोहोचले. त्यांना 2 लाख डॉलर्सच्या (भारतीय चलनानुसार 1 कोटी 65 लाख रुपये) बॉण्डवर आणि अन्य अटींवर मुक्त करण्यात आले. या अटींमध्ये प्रकरणातील प्रतिवादी असलेल्यांना सोशल मीडियावरुन धमकवू नये या अटीचाही समावेश आहे. ट्रम्प हे अवघ्या 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांच्या या अटकेचा परिणाम त्यांच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी दाव्यावर होण्याची दाट शक्यता आहे.
जॉर्जियामध्ये बेकायदेशीररित्या 2020 साली झालेल्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये ट्रम्प यांचा अमेरिकेत कैद्यांचा फोटो काढला जातो तसा मग शॉट घेण्यात आला. तुरुंगातील रेकॉर्डप्रमाणे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम् यांनी बुकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ट्रम्प हे जवळपास 20 मिनिटे फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये होते. ट्रम्प यांनी या तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मी काहीही चुकीचे केलेले नाही, असे ट्रम्प म्हणाले. फुल्टन काउंटीच्या शेरिफ कार्यालायाने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मग शॉट म्हणजेच तुरुंगात काढलेला फोटो जारी केला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार तुरुंगातील रेकॉर्डनुसार ट्रम्प यांना प्रातिनिधिक स्वरुपाची अटक करण्यात आली होती. त्यांचा कैदी क्रमांक P01125809 असा होता. जॉर्जियामध्ये ट्रम्प हे चौथ्यांदा शरण आले.