बुलढाणा/एनजीएन नेटवर्क
एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण करून तिचा गावातील लोकांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये घडली आहे. अंढेरा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन जबर मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे तीन आरोपींवर दाखल केले आहेत. मात्र अद्याप आरोपींना अटक केली नाही. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय अधिकारी असलेली एक डॉक्टर तरुणी बारलिंगा या छोट्याशा गावात सायंकाळी पाच वाजता आली होती. ही तरुणी गावातील एका घरात शिरली. मात्र या घरातील दोन पुरुष आणि एक महिलेने या तरुणीला जबर मारहाण करत गल्लीत आणि मारहाण करत गावातून फिरवले. या तरुणीला इतकी मारहाण केली की या तरुणीचे कपडे सुद्धा फाटले. सुदैवाने गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले. अंधेरा पोलिसांनी चौकशीअंती बारलिंगा गावातील एक महिला आणि दोन पुरुषांवर जबर मारहाण करणे आणि विनयभंग करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
प्रेमसंबंधातून उद्भवले प्रकरण …
पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वप्नील जायभाये दोघेही डॉक्टर आहेत. दोघेही अमरातीतील दर्यापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांचे गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांचे पटत नाही. यातूनच प्रियकर तिचा फोन उचलत नव्हता. यामुळे त्याला भेटायला ती त्याच्या घरी सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावात गेली. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी तिला जबर मारहाण करत शिवीगाळ केली. पीडित तरुणीने काही सूज्ञ नागरिकांच्या मदतीने अंढेरा पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली.