लखनौ/एनजीएन नेटवर्क
उत्तर प्रदेशात खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल थेट उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयातील डॉक्टरांनी एका मुलाची चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी निष्काळजीपणे अडीच वर्षाच्या चिमुरड्याच्या जीभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया केली आहे. हा प्रकार घरच्यांना कळताच एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे नेते रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी जाणूनबुजून मुलाची चुकीची शस्त्रक्रिया करून त्याला मुस्लिम बनवले असा आरोप आता केला जात आहे.
बरेली जिल्ह्यातील बारादरीतील संजय नगर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या अडीच वर्षांच्या मुलाला बोलता येत नव्हते. त्या व्यक्तीला कोणीतरी सांगितले की मुलाच्या जिभेची शस्त्रक्रिया केली तर सगळं काही ठीक होईल. त्यामुळे मुलाच्या वडिलांना त्याला देलापीर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर मोहम्मद जावेद याने मुलाच्या जीभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाची चुकीची शस्त्रक्रिया केली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांचे नेते रुग्णालयात दाखल झाले होते.
दुसरीकडे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चुकीच्या पद्धतीने मुलाची खतना केल्याची दखल घेतली आहे. खतना करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याचा विचार आयोग करत आहे. आयोगाने याबाबत बरेली पोलिसांकडे तक्रारही केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक रुग्णालयात पाठवले आहे आणि आरोपात सत्यता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.