नाशिक/एनजीएन नेटवर्क
आज बदलत्या युगात माणुसकीची वीण विसविशीत होत चालली असताना आपल्याकडे आश्रयाला असलेल्या तरुणीला शिक्षणाची कवाडे उघडून देण्यापासून ते तिचा विवाह लावून देत थेट कन्यादान करण्याचे दातृत्व दाखवण्याचा डॉक्टर दाम्पत्याच्या मनाचा मोठेपणा जिल्हाभर चर्चेत आला आहे. माणुसकीच्या नात्यातील हा अनोखा ओलावा समाजापुढे एक आदर्श घालून देणारा ठरावा.
नाशिक शहरात गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ अश्विनी आणि संदीप कोतवाल दाम्पत्याने या नव्या नात्यातून सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या मुद्रा या सहा महिन्यांच्या कन्येचा सांभाळ करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात असलेल्या कोतवाल दाम्पत्याची शोधमोहीम ‘नंदिनी’च्या येण्यातून थांबली. नंदिनीचा लहानग्या मुद्राला चांगलाच लळा लागल्याने हळूहळू तिने विश्वासाहर्ता आणि प्रामाणिकपणाच्या पैलूंच्या जोरावर कोतवाल परिवाराचा विश्वास संपादन केला. लवकरच ती परिवाराचा अविभाज्य घटक बनली. मुद्रा सोबत नंदिनी हेदेखील एक अपत्य असल्याची भावना ठेवून कोतवाल दाम्पत्याने तिला मानसकन्या म्हणून दर्जा दिला.
कालानुरूप एवढ्यावरच न थांबता नंदिनीच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेत डॉ. कोतवाल यांनी तिचे पदव्युत्तर (एम.ए.) शिक्षण पूर्ण केले. नंदिनीच्या आयुष्याला रचनात्मक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी तिला नोकरी लावून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. नंदिनी उपवर होताच तिच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी घेत थेट कन्यादान करण्याचे दातृत्व कोतवाल दाम्पत्याने दाखवले. विवाह सोहळ्यात आपल्या मानस कन्येला संसारोपयोगी साहित्याची उपलब्धता करून देण्यातही त्यांनी कमतरता ठेवली नाही. कथा-कादंबरी अथवा सिनेमात शोभणारे हे कथानक प्रत्यक्षात उतरवण्याच्या या सजग कर्तृत्वातून डॉ अश्विनी आणि संदीप कोतवाल यांनी आगळावेगळा सामाजिक आदर्श घालून दिला आहे. दुसऱ्या शब्दांत आपल्याकडे सेवेत असलेल्या ‘नंदिनी’च्या कन्यादानातून नाशिकमधील डॉक्टर दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीरुपी ‘मुद्रा’ उमटवण्याची कर्तृत्वसंपन्नता अधोरेखित केली आहे. त्यांच्या या अनोख्या कर्तृत्वाची जिल्हाभर चर्चा होत आहे.