मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील गुरु गोबिंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च सेंटरच्या ग्रंथालय विभाग आणि महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त ‘ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या एकपात्री नाटकाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन, प्रसार आणि जतन या उद्देशाने दरवर्षी १४ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा केला जाणारा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ या कार्यक्रमातून अधिक अर्थपूर्ण झाला.
कार्यक्रमात वकिली व्यवसायातील विधिज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रेरणा देशपांडे आणि संगीत संयोजक समाधान मुर्तडर यांनी सादर केलेल्या ‘ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या नाटिकेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चार संतभावंडांचे जीवन, त्यांची आध्यात्मिक वाटचाल आणि मुक्ताईंची संतत्वातील भूमिका त्यांच्या दमदार अभिनयातून प्रभावीपणे मांडली गेली. संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताई या वारकरी परंपरेतील पहिल्या स्त्री संत म्हणून ओळखल्या जातात. समाजजागृती, अध्यात्मिक मूल्ये आणि ज्ञानेश्वरांना समाधी घेण्यापासून परावृत्त करणारी त्यांच्या अभंगांतील हाक नाटिकेतून अत्यंत सुंदर रीतीने साकारली गेली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर मोहोड, ग्रंथपाल निशिगंधा खैरे, तसेच चारूशीला पाटील मंचावर उपस्थित होते. प्राचार्यांच्या हस्ते देशपांडे मॅडमचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ निकम आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि “विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात शुद्ध मराठीचा वापर करावा, मराठी पुस्तके वाचावीत, मराठी ही केवळ संभाषणाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीचा कणा आहे. भाषा आपल्याला समृद्ध परंपरांशी जोडते आणि ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ केवळ सोपस्कार म्हणून साजरा न करता ती जीवनशैली बनवावी.” असे संबोधले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मधुराणी आणि प्रतीक्षा पगार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रसादिक ‘पसायदान’ने करण्यात आली.
Comments are closed.