घोटी/राहुल सुराणा
नाशिक जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने टॉपरवर असलेल्या घोटी- सिन्नर महामार्गावर घोटीपासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणात महाकाय खड्डे निर्माण झाल्याने अपघात तर वाढलेच परंतु खड्ड्यांमुळे गतिमान वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येते मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागही याबाबत हात वर करत असल्याने घोटी सिन्नर महामार्ग नक्की राज्य मार्ग आहे की राष्ट्रीय महामार्ग याबाबतचे कोडे अद्यापही उलगडले नाही. त्यामुळे हा मार्ग म्हणजे घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे.
घोटी – सिन्नर महामार्गावर घोटी पासून काही अंतरपर्यत मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे या मार्गावर शिर्डी, भंडारदरा, आदी भागाकडे जाणारे प्रवाशांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे तसेच आता समृद्धी महामार्गाचीही वाहतूक याच मार्गावर असल्याने मोठया प्रमाणात वाहतूक आहे. या महाकाय खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वेग घेता येत नाही याबरोबरच खड्ड्यातील पाण्यामुळे पाणी आहे की खड्डा हे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघात होतात. दरम्यान हे महाकाय खड्डे त्वरित बुजवून वाहनचालक व प्रवाशांना धोकादायक स्थितीतून बाहेर काढण्यात यावे.हे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक तथा माजी सरपंच पांडुरंग शिंदे यांनी दिली.
या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकींना अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या मूलभूत प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही, राज्य व बांधकाम विभागाचे अधिकारी का दुर्लक्ष करतात हा संशोधनाचा भाग आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक वेळा खड्ड्यांवर थातूर मातूर उपचार करण्यात आले मात्र हे खड्डे मजबूत का होत नाही असा प्रश्न वाहनचालकात व्यक्त होत आहे. घोटीजवळ याच मार्गावर रेल्वेब्रीजवर असलेले खड्डे हे जीवघेणे ठरत आहे. त्यावर अनेक दुचाकीस्वरांचा अपघात होऊन जखमी झालेत.
—————–
@घोटी -सिन्नर महामार्गावरून प्रवासी, पर्यटक, व भाविकांचा वाहनांचा प्रवासाची वर्दळ कायम आहे त्यात समृद्धी महामार्गाच्याही वाहनांची भर पडली आहे मात्र या महामार्गावर घोटी ते पिंपळगाव मोर दरम्यान खड्डे पडल्याने प्रवासासाठी हा महामार्ग धोकादायक ठरू लागला आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडे याबाबत चौकशी व तक्रार करूनही दखल घेण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग कोणाचेच या खड्ड्यांकडे लक्ष नसल्याने या रस्त्याची अवस्था घर का ना घाट का अशी झाली आहे. या मार्गावर असलेले खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा आठवडाभरात लक्षावेधी आंदोलन करू.
- पांडुरंग शिंदे, शेतकरी नेते तथा माजी संचालक कृउबा,घोटी
—————