नांदेड/एनजीएन नेटवर्क
इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये उघड झाली आहे. किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. या घटनेमुळं पालकांच्या मनातही धास्ती भरली आहे. जितेंद्र धोंडे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी शिक्षकाने मुलीला आमिष दाखवून तब्बल तीन दिवस म्हणजेच 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेले. त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्याबाबत धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी धास्तावली होती.
या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घाबरली होती. मुलीने शाळेत जाण्यासही नकार दिला. तेव्हा मुलीच्या आईला थोडी शंका आल्यानंतर तिने अधीक विचारपूस करण्यास सुरूवात केली. आईने प्रेमाने समजवल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अल्पवयीन मुलीसोबत घडलेला धकादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्याविरुद्ध कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला अटकही करण्यात आली आहे.