NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

चर्चा निष्ठावंतांच्या मांदियाळीची.. ! ( सारीपाट / मिलिंद सजगुरे )

0

** एनजीएन नेटवर्क

     सध्या ‘पांचो उंगली घी में’ असलेल्या भाजपने नवे कारभारी नियुक्त करण्याचा धडाका लावला आहे. शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्याच्या काही दिवस आधी राज्यातील ‘टीम बावनकुळे’चे शिलेदार जाहीर करण्यात आले. त्यांतर्गत जिल्हा आणि शहरप्रमुखांचा समावेश आहे. नाशिकची जबाबदारी प्रशांत जाधव तर जिल्ह्याचे त्रिभाजन करून तिथे शंकरराव वाघ, सुनील बच्छाव आणि निलेश कचवे यांची वर्णी लावण्यात आली. लगोलग शरद पवारांशी सवतासुभा केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारीही निश्चित करण्यात येवून त्यांच्या नियुक्तीपत्र वाटपाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. राज्यस्तरावर बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, नाशिक शहरप्रमुख म्हणून रंजन ठाकरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे आदी नियुक्त्या जाहीर झाल्या. दोन्ही पक्षांच्या सूचीवर दृष्टिक्षेप टाकला तर सहजगत्या फरक अधोरेखित करता येणे शक्य होते. भाजपच्या शिलेदारांना पक्षनिष्ठेच्या कसोटीवर पाजळून घेण्यात आलेय, तर राष्ट्रवादीची पदे बहाल करताना भुजबळ-निष्ठेचे प्रमेय लावण्यात आले आहे.  

    भाजपला आधीच्या दोन सार्वत्रिक निवडणुकांची २०२४ मध्ये पुनरावृत्ती करायची आहे. त्यादृष्टीने गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेते-कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. बरं, कोण काय करते याचे हिसाब-किताब तपासले जात असल्याने दिलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पडण्यावाचून तरणोपाय राहिलेला नाही. ‘हेडमास्तर’ स्वतः काम करणारा असला की, इतरांना कामचुकारपणा औषधालाही करून चालत नाही, याचे पुरेपूर प्रत्यंतर भाजपमध्ये दिसून  येते. अर्थात ही ‘कार्यमग्नता’ अंगी शिस्त बाणलेल्या जुन्या-जाणत्यांना मानवत असली तरी नवगतांच्या ती पचनी पडत असेल का, हा अनुत्तरीत प्रश्न ठरावा. त्याचाच भाग म्हणून पदांचे वाटप करताना पक्षाने अलीकडे भाऊगर्दी झालेली असतानाही निष्ठावान शोधून काढलेत. वर्षानुवर्षे पक्ष सत्तेविना असतानाही निष्ठा कायम राखलेले नेतृत्वाने हेरले. किमान या चेहऱ्यांना तरी ‘आयाती’चा शिक्का लागलेला नसेल, याची पक्षाने पुरेपूर काळजी घेतल्याचे नाशिकपुरता तरी दिसून आले. बरं, निफाडचे वाघ काय किंवा नाशिकचे जाधव, पक्ष आपली या स्तरावर दखल घेईल, याची त्यांना ध्यानीमनीही कल्पना नसावी. इच्छुकांच्या नामावलीतही त्यांचा उल्लेख असल्याचे कोणाच्या वाचण्यात आले नाही. गल्ली ते दिल्लीतील सत्तेमध्ये असूनही निष्ठा हाच आमचा पद बहालीचा निकष आहे, हे भाजपने किमान यावेळी तरी दाखवून दिले. अलीकडील राजकारणात हे अभावानेच आढळते.

   स्वाभिमानाच्या मुद्द्यावर जन्माला आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उभा छेद गेल्यानंतर जिल्ह्यातही कार्यकर्त्यांची काका-पुतण्या गटात विभागणी झाली. पक्ष एकसंघ जिल्हाभर पकड असलेले छगन भुजबळ हे शरद पवार यांचे ‘ब्लू आईड बॉय’ म्हणूनच परिचित होते. पक्षातील ‘दादा’गिरीच्या कक्षेत भुजबळ कधीच नव्हते. तुलनेत जिल्ह्यातील बव्हंशी आमदार अजितदादा यांचे समर्थक म्हणूनच सातत्याने चर्चेत राहिले. पक्षफुटीनंतर भुजबळ अनपेक्षितपणे ‘साहेबां’ना सोडून ‘दादां’च्या आश्रयाला गेलेत. त्यामागील गणिते वेगळी असलीत तरी पक्ष संघटनेवर पूर्वीप्रमाणेच पकड राहावी, याची भुजबळ यांनी पुरेपूर काळजी घेतली. कर्डक, पगार, ठाकरे, बलकवडे यांची निष्ठा याधीही भुजबळचरणी अर्पित होती. स्वाभाविकपणे सवत्यासुभ्यात ही मंडळी भुजबळ यांच्या सोबत राहिली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. याआधीचा इतिहास पाहता नाशिक शहरात पक्षाला दमदारपणे उभे राहताच आले नाही. आज जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार असले तरी आगामी निवडणुकीत हे संख्याबळ कायम राहील, याची शाश्वती कोण देणार? या मुद्द्याचा विचार करता पक्ष बांधणीसाठी नवे कारभारी नेमकी कोणती पावले उचलतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, आज पक्ष सत्तेत असला तरी उद्याच्या निवडणुकांत तीन पक्षांच्या महायुतीत या मंडळीसमोर स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचे आव्हान असणार आहे.      

 सारांशात, दोन वेगळ्या पक्षांचे पदाधिकारी जाहीर झाले असले तरी नियुक्ती निकषांतील तफावत बरेच काही सांगून जाते. पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ते व्याप्त असायला हवेत, या तत्वज्ञानावर विश्वास असल्याचे भाजपच्या यादीवरून सूचित होते, तर पक्षावरील पकड ढिली होवू नये या उद्देशाने स्वकीयांची वर्णी लावण्याची दूरदृष्टी राष्ट्रवादीच्या नामावलीतून अधोरेखित होते. बाकी विश्लेषण करायला जनता-जनार्दन पुरेशी सजग आहेच.  

Leave A Reply

Your email address will not be published.