नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न जटील बनला आहे. याच पार्श्वभूमीवर नूतन मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी नदी किनारी तसेच पूररेषेतील बांधकामे अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, पवित्र रामकुंड परिसर स्वच्छ ठेवण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या तसेच नदीत कपडे व वाहने धुणारे तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची सूचनाही त्यांनी प्रशासनाला करण्यात आली आहे.
गोदावरी नदी संवर्धनांविषयी आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. धार्मिक पूजा विधीसाठी संपूर्ण देशातून भाविक रामकुंड येथे येतात. त्यामुळे या परिसराची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. गोदावरीच्या पुलावरून नागरिक निर्माल्य पात्रात टाकतात. त्यासाठी अशा भागात निर्माल्य कलशाची उपलब्धता करण्याची गरज डॉ. करंजकर यांनी मांडली. पात्रात निर्माल्य टाकण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी शहरातील सर्व पुलांवर संरक्षक जाळी बसवावी. अनेकदा आवाहन करूनही गोदा पात्रात कपडे व वाहने धुतली जातात. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे. पूररेषेतील बांधकाम व तसेच नदीकिनारी असलेले अतिक्रमण काढण्याची सूचना त्यांनी केली.