नाशिक/एनजीएन नेटवर्क
एका खाजगी कंपनीला जागा एनए करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना दिंडोरीचे प्रांत डॉ. निलेश अपार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बड्या अधिकारांच्या लाचखोरीमुळे नाशिक जिल्हा चर्चेत असताना आजच्या घटनेने त्यामध्ये भर पडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एका खाजगी कंपनीची जागा एनए (अकृषक) करून देण्याच्या मोबदल्यात दिंडोरी प्रांत डॉ. अपार यांनी ४० लाखांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येवून डॉ. अपार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.