बुलढाणा/एनजीएन नेटवर्क
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर देशभरातून या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला? पहाटेच्यावेळी झालेल्या या अपघाताचा घटनाक्रम काय होता याविषयी अनेक तर्कतवितर्क लावले जात आहेत. अशातच पोलिसांनी या अपघाताचा घटनाक्रम सांगत माहिती दिली. पोलिसांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पोलीस म्हणाले, पहाटे १.३५ वाजल्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ही बस आधी समृद्धी महामार्गावरील वीजेच्या खांबाला धडकली. धडकेनंतर बस पुढे आल्यावर डिझेल टँक दुभाजकाला लागला. यामुळे डिझेल टँक फुटला. पुढे बस दुभाजकाला घासत गेली आणि त्यामुळे बस उलटी होऊन आग लागली. या बसमध्ये एकूण ३३ लोक होते. मॅनिफेस्टमध्ये २६-२७ लोक होते. काही प्रवासी रस्त्यात येताना घेतले असतील. यापैकी बसच्या काचा फोडून बाहेर पडता आले, अशा ८ प्रवाशांचा प्राण वाचला आहे. त्यात २५ वर्षीय चालकाचाही समावेश आहे. शेख दानिश शेख इस्माईल असे बस चालकाचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.