NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पहिल्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी..

0

त्र्यंबकेश्वर/रविंद्र धारणे

      अधिक श्रावण महिना संपल्यानंतर निज श्रावण महिन्यातील पहिल्याच श्रावण सोमवार व नागपंचमीचा मुहूर्त साधत आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. 

    रविवारी रात्रीपासुनच तरूणाई ब्रह्मगिरी  प्रदक्षिणेला रवाना होत होती. तर पहाटे पाचपासुन शेकडो भाविक अभंग गात, बम बम भोले चा जयघोष करीत प्रदक्षिणेला जात होते. पहाटे पासुनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पुर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातुन पेड दर्शन व नेमुन दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत  होते. देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. खाजगी वाहनांना गावात प्रवेशबंदी होती.

      दुपारी तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती नारायण फडके यांनी पुजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणुन यज्ञेश कावणईकर, मंगेश दिघे, संजय दिघे, कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त स्वप्निल शेलार, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, रुपाली भुतडा यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पुजा झाल्यावर पालखी परत मंदिरात आणण्यात आली. त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक वेदमुर्ती उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोषपुजा संपन्न केली. भगवान त्र्यंबकराजाचा शृंगार करुन आरती केली. यावेळी विश्वस्त कैलास घुले यांची रुद्राभिषेक पुजा केली.

  श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास पन्नास हजार भाविकांनी आज येथे हजेरी लावली तर पाच हजारापेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बिपीन शेवाळे   व सहकार्‍यांनी यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.