मुंबई/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठाने आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी आज घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आलेत. दरवर्षी जपानमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते. महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अॅप्रिसिएशन’ दिले आहे. कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष रे. सोईडा र्युषो यांनी हे पत्र दिले आहे. त्यात ते म्हणतात, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत.