NGN News
Latest Marathi News

आगामी कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटीच्या कामांना मान्यता

  • कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्र्यंबक-नाशिक सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. कुंभमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा, याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.

कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये, म्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास दोन ते चार हजार मुलांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. महिला बचत गटांच्या कुंभमेळातील समावेशनाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले.

बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होत्या. तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे बैठकीत सहभाग घेतला.

Comments are closed.