नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरात तब्बल 20 विद्यापीठे बोगस असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. देशाची राजधानी दिल्ली ही तर बोगस विद्यापीठाची राजधानी ठरली आहे. देशातील 20 बोगस विद्यापीठांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे असल्याचे उघडकीस आले आहे. या 20 बोगस विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील बोगस विद्यापीठांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीत सर्वाधिक आठ बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पद्दुचेरी, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील विद्यापीठांचा देखील या यादीत समावेश आहेत. या विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात विद्यापीठ आयोगाने म्हटले आहे की विद्यापीठाच्या व्याख्येनूसार युजीसी एक्ट 1956 सेक्शन 2 ( फ ) अथवा सेक्शन 3 नूसार ही विद्यापीठे कायदेशीर नाहीत. त्यामुळे त्यांनी पदवी देणे किंवा युनिव्हर्सिटी नाव धारण करणे हे निष्पाप विद्यार्थ्यांची घोर फसवणूक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयागाने म्हटले आहे. या विद्यापीठांच्या कुलगुरुंना विद्यापीठ अनुदान आयोगाने पाठविलेल्या पत्रात आपल्या संस्थेच्या भोंगळ कारभाराचा अनेक विद्यार्थी बळी ठरत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे, येत्या पंधरा दिवसात याबाबतचा खुलासा करावा असेही आयोगाने या पत्रात म्हटले आहे.