‘निमा’च्या शिष्टमंडळास आश्वासन; सविस्तर निवेदन सादर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : संरक्षण विषयक साहित्य व उपकरणांच्या उत्पादनासाठी नाशिकमध्ये अत्यंत पोषक वातावरण उपलब्ध असल्यामुळे येथे ‘डिफेन्स इंडस्ट्रियल क्लस्टर’ (संरक्षण औद्योगिक क्लस्टर) स्थापन करण्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी दिले.
केंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग नाशिक दौऱ्यावर आले असता, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिकमध्ये डिफेन्स इंडस्ट्रियल क्लस्टर स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. तसेच या संदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या विमान निर्मिती विभागामुळे नाशिक हे देशातील महत्त्वाच्या संरक्षण उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून आधीच ओळखले जाते. या विभागाने SU-30 MKI विमानांच्या परवानाकृत उत्पादनापासून पूर्ण क्षमतेच्या स्वदेशी उत्पादनाकडे यशस्वी वाटचाल केली आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते एचएएल येथे LCA Tejas Mk-1A साठी तिसऱ्या उत्पादन वाहिनीचे तसेच HTT-40 मूलभूत प्रशिक्षण विमानासाठी दुसऱ्या अंतिम जोडणी वाहिनीचे (Final Assembly Line) उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे देशाच्या संरक्षण गरजांसाठी तेजस Mk-1A लढाऊ विमाने आणि स्वदेशी प्रशिक्षण विमानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला राज्याचे एक समर्पित ‘संरक्षण आणि एरोस्पेस केंद्र’ म्हणून घोषित केले असून या क्षेत्रात नवीन संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत सप्लाय चेन यांसह एक सक्षम औद्योगिक परिसंस्था आधीच उपलब्ध आहे.
.. तर पुढील महत्त्वाचे लाभ होऊ शकतात :
- तेजस, HTT-40, SU-30 अपग्रेड, MRO उपक्रम तसेच भविष्यातील संरक्षण प्रकल्पांसाठी उच्च-परिशुद्धता घटक, उपप्रणाली व असेंब्ली निर्मितीसाठी लघु व मध्यम उद्योगांना एक केंद्रित व्यासपीठ उपलब्ध होईल.
- एकात्मिक विक्रेता (Vendor) नेटवर्क निर्माण होऊन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि महत्त्वाच्या सुट्या भागांसाठी परदेशी OEM वर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.
- नाशिकला स्वयंपूर्ण संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करता येईल आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाशी ते पूर्णपणे सुसंगत ठरेल.
वरील सर्व बाबींचा विचार करून संरक्षण मंत्रालयाने नाशिक येथे डिफेन्स इंडस्ट्रियल क्लस्टर स्थापन करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रस्ताव, एमएसएमई मॅपिंग, जमिनीची उपलब्धता यासंबंधी माहिती देण्यासाठी तसेच राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी निमाची पूर्ण तयारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय संरक्षण सचिवांना भेटलेल्या शिष्टमंडळात निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल आणि सचिव राजेंद्र अहिरे यांचा समावेश होता.
Comments are closed.