- पोकळे गॅंगच्या मुसक्या आवळण्याची मागणी
अहिल्यानगर : एनजीएन न्यूज नेटवर्क
डेअरीमध्ये दूध दिल्यानंतर आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर कुठलेही कारण नसताना धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झालेला सराईत गुन्हेगार दीपक पोकळे सात दिवसानंतरही अद्याप फरारच असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील रहिवासी असलेले शेतकरी अनिल गणपत आहेर (वय 47 वर्ष) हे दि 12/09/2025 रोजी रात्री 08 वाजेच्या सुमारास लोहारे गावातील कांचनताई थोरात दुध डेअरीमध्ये दुध घालुन झाल्यानंतर घराकडे चालले होते. त्यावेळी आवजीनाथ मंदिराजवळील चौफुलीवर गावातील रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार दीपक पोकळे व त्याच्यासोबत असणारा ईसम (नाव माहीत नाही) हे संघटीतपणे एकत्रित येऊन हातात चाकू घेऊन रस्त्यात दहशत करत होते. त्यावेळी तेथे गर्दी झाल्याने अनिल आहेर हे दुचाकी थांबवून रस्त्यातील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होते. त्यावेळी गुंड दीपक पोकळे व त्याचा साथीदार हे दोघे त्यांच्या जवळ आले. यापैकी पोकळे याने ‘का रे.. लई माजलास का’, असे म्हणुन त्याच्या हातातील धारदार चाकुसारख्या वस्तूने डोक्यात, डाव्या हाताच्या कोपरावर जिवे मारण्याच्या उददेशाने सपासप वार केले व पुन्हा धमकी दिली. ‘तुला आज मी जिवंत सोडत नसतो’, असे बोलला. त्याच्या सोबत असलेल्या ईसमानेही चाकुसारख्या धारदार वस्तुने अनिल यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अनिल यांनी चुकविला. दीपक पोकळे याने केलेल्या डोक्यातील वारामुळे रक्तभंबाळ अवस्थेत अनिल हे चक्कर येवुन खाली कोसळले.
त्यानंतर या ठिकाणी त्यांचे वडील, पत्नी यांनी अनिल यांना तातडीने औषधोपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी संगमनेर येथे व त्यानंतर संगमनेर येथील जठार हॉस्पीटल येथे दाखल केले. दरम्यान, अनिल यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेला सात दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप हल्लेखोर दीपक पोकळे ब त्याचा साथीदार फरार असल्याने पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर पोकळे गॅंगच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी मिरपूर लोहारे ग्रामस्थांनी केली आहे.
दीपक पोकळेवर ‘मोक्का’सह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद
हल्लेखोर सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत खून, खुनी हल्ले, दरोडे, खंडणी, मारहाण करून लूटमार, अपहरण अशा प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका अपहरणाच्या गुन्ह्यात तर दीपक पोकळे या गुंडावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून, या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याचा जामीन रद्द करून तात्काळ अटक करावी, अन्यथा आणखी गंभीर गुन्हे घडण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांमध्ये पोकळे गँगची दहशत
घटनास्थळी दीपक पोकळे व त्याच्या एका साथीदाराने गावातील आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या इतरही लोकांना मारहाण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र पोकळेच्या दहशतीला घाबरून संबंधित लोकांनी पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ केली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला सोडणार नाही, अशा धमक्याही पोकळे गॅंगने गावकऱ्यांना दिल्या आहेत. सध्या त्याची गुंडगिरी इतकी वाढली आहे की भरदिवसा दिसेल त्याला तो चॉपर आणि बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत असल्याने लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी पोकळे गँगची गावातून धिंड काढून त्यांची दहशत मोडीत काढण्याची मागणी होत आहे.
रविवारी ग्रामस्थांची निषेध सभा
सदर घटनेप्रकरणी संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. एका निष्पाप शेतकऱ्यावर विनाकारण प्राणघातक हल्ला झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता समर्थ आवजीनाथ मंदिरामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मिरपूर लोहारे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Comments are closed.