नाशिक/एनजीएन नेटवर्क
कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने एल्गार पुकारला असून निषेधार्थ जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंद अधिक काळ सुरु राहिल्यास त्याचा फटका मोठ्या शहरांतील ग्राहकांना दरवाढीतून बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचे सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीच्या सर्व घटकांनी बंद पाळावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक व उत्पादकांकडून करण्यात आले आहे. सरकारला चुकीची माहिती देणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांविरोधात आंदोलनाचा पवित्रा उत्पादक संघटनेने घेतला आहे. निर्यात शुल्क लादल्याने बांग्लादेश सीमेवर कांदा घेऊन जाणाऱ्या शेकडो गाड्या आणि बंदरात तितकेच कंटेनर अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दररोज अंदाजे ६० हजार क्विंटलहून अधिक कांद्याचे लिलाव होतात. लिलाव बंद झाल्यास शहरी भागात पुरवठा विस्कळीत होईल. त्याची झळ सामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.