शहापूर/एनजीएन नेटवर्क
समृद्धी मार्गावर शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.
काही गंभीर जखमींना शहापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गर्डरखाली दोन मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. एनडीआरएफचे अधिकारी सारंग कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून सांगितल्याप्रमाणे 28 जण इथे उपस्थित होते. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले.
नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लाँच करणाऱ्या व्ही एस एल कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.