नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील डॉक्टरांच्या टीमने सात वर्षीय वर्षीय बालिकेच्या छातीतून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अतिशय गुंतागुंतीची व जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाल्याने मयुरीला जीवदान मिळाले असून, तिच्या पालकांनी मविप्र रुग्णालयासह डॉक्टरांच्या पथकाला धन्यवाद दिले आहे.
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव वणी येथील साधारण परिस्थिती असलेले शेतकरी किरण सुरेश डावरे यांची कन्या मयुरी हिला गेल्या काही महिन्यांपासून छातीत दुखणे, दम लागणे, खोकला व जेवण न करण्याचा त्रास जाणवत होता. पिंपळगाव बसवंत स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करूनही आराम न मिळाल्याने पुढील तपासणीसाठी नाशिकमधील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारांसाठी सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आणि शस्त्रक्रिया यशस्वी होईलच, याची खात्रीही दिली गेली नाही. त्यातच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तेथून डिस्चार्ज घेण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. अशा परिस्थितीत मुलीचे मामा आणि मविप्रचे सभासद असलेले दीपक गणोरे यांनी मविप्रचे पेठ-दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यावर प्रवीण जाधव यांनी मयुरीला मविप्र वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १२ जुलै रोजी मयुरीला मविप्र रुग्णालयात बालरोग विभागात दाखल करण्यात आले. हृदयाची सोनोग्राफी, एक्स-रे आणि छातीचा सिटी स्कॅन यामधून तिच्या हृदयाच्या मागे ३.९ × ४.३ × ६.१ सेमी आकाराची गाठ असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, वैद्यकिय अधीक्षक डॉ. वसंत कवडे यांनी डॉक्टर, नर्सेस व प्रशासकीय टीम गठीत केली. डॉ. कवडे यांच्या नियंत्रण, मार्गदर्शन व सूचनेनुसार समितीने मोठी जोखीम घेत २६ जुलै रोजी दोन तासांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
Comments are closed.